इतिहासात खोत, पाटील, मालगुजार अशा मोठ्या माणसांच्या नावांना आपण पुस्तकात वाचले — चित्रपटात पाहिले असेल. तसाच एक खोत – ज्यांचा जमिनी वाडे वैगरे होते असे मालाड पश्चिम येथे रहात आणि त्यांचे दफ्तर (म्हणजे कार्यालय) संभाळायला तेव्ह्द्याच ताकदीचा हुशार व चणाक्ष माणूस होता. त्यांचे नाव होते गणपत जीवनजी महंत – हे गणपतराव खोताकडे कामास असल्यामुळे त्यांचा रुबाब तेव्हढाच होता. ह्याला जोड त्यांच्या बलदंड शरीराची – सात फुट उंचीची होती. जेव्हा ते घोड्यावरून आक्सा-एरंगल पर्यंत सहज एक फेरफटका मारत. तेव्हा तो एक राजबिंडा माणूस राजाच वाटायचा. लोक त्यांना प्रेमाने भाऊ म्हणत. घोड्यावरून फेरफटका मारून आले की ते शंकराच्या देवळासमोर येत. पायउतार होत दर्शन घेत. शंकराचे, आई पाटलादेवीचे व हनुमंताचे दर्शन घेऊन मग त्यांचा दिनक्रम सुरू होई. एकदा रपेट करून पायउतार होताना त्यांना म्हणजे भाऊंना शंकराच्या पायरीवर एक व्यक्ती बसलेली दिसली, भाऊ श्रद्धाळू असल्यामुळे त्यांनी त्या गृहस्थांची विचारपूस केली.
नमस्कार! – आपण ह्या मालाड गावचे दिसत नाहीत?
“आम्ही गावोगावी देवळे फिरून दर्शन घेत इथवर आलो”
भाऊंना त्या व्यक्तीचे तेज भावले. त्यांच्या बोलण्यावर भाऊ प्रभावित झाले. भाऊंनी त्यांना इथेच राहण्याची विनंती केली व त्यांना आपले गुरू केले. त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. भाऊंचा गुरू म्हणजे मालाडकरांचे ते श्रद्धास्थान झाले. गावकऱ्यांनी त्यांना गोपीनाथ केले. कालांतराने ते हरीनंद स्वामी म्हणून लोकप्रिय झाले. तेव्हा ही तीन्ही देवळं जुन्या गावच्या वाड्या सारखी होती उतरत्या लाकडी छपराची. हरीनंद स्वामींच्या वास्तव्याने जागा साफ व पवित्र झाल्या. तेव्हा गणपत जीवनजी महंतांनी म्हणजे भाऊंनी स्वखर्चाने ह्या तीन्ही देवळाची डागडुजी केली. रंगरंगोटी करून देवळाचा कायापालट केला
शंकर, पाटलादेवी व हनुमंताच्या देवळांना लौकिक मिळाला हा काळ होता साधारण १८०५. मूळ ह्या तीन्ही मंदिराच्या बांधकामाचे काम गणपत जीवनजी महंतांनी केले होते. मधल्या काळात गावचे साधू हरीनंद स्वामी यांनी देह ठेवला. गावचे श्रद्धास्थान हरपल्याने गावकऱ्यानमध्ये मरगळ आली, जणू गावचा प्राण हरपला. भावनाविवश गणपत महंतांनी साधूची समाधी शंकर मंदिराच्या परिसरात बांधली आणि एक दिवस त्यांना दृष्टांत झाला – माझ्या समाधीवर रामाची मूर्ती स्थापन कर. भाऊंची झोप उडाली. श्रीरामाची स्थापना म्हणजे मोठा खर्च – मंदिराच्या पायाभरणी पासून ते मूर्ती पर्यंतचा खर्च कोणी करायचा ? गावात गोर गरिबी होती. मग देवळासाठी पैसे कोण देणार? ह्या विचारात असताना त्यांनी आपल्या घरचे सर्व दागिने घेऊन मारवाड्या कडे गेले सोन विकायला. तेव्ह्याच्या प्रामाणिक सावकाराने सोन न घेता त्यांना विचारल.
“एवढी काय अडचण आली दागिने विकता ते”
तेव्हा घडला प्रकार भाऊंनी सावकाराला सांगितला. तेव्हा सावकाराने मंदिर बांधण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरविले. देवळाचे पाया भरणीला सुरवात झाली. पायरीवर दगड तासायला लागले दरवाजाच्या फळ्या चिरायला सुरवात केली. आणि भाऊंना मूर्तीचा प्रश्न उभा राहिला – तोही देवाने परस्पर सोडवला. शंकराचे दर्शन घेऊन वळणार तोच त्यांना एक राजस्थानी व्यक्ती दिसली. त्यांनी हात जोडून भाऊंना विनंती केली “ रामराम जी – मी एक चीज आणलीय विकायला. जरा नजर घाला. त्यांनी बैलगाडीतल्या मूर्तीवरचा कपडा बाजूला सारला, पाहतो तर काय, अतिशय सुबक सुंदर श्री राम सीता व लक्ष्मणच्या मूर्ती पाहून प्रसन्न वाटल – त्यांनी विचारलं – ह्याची किंमत काय?
भाऊंना पक्की खात्री होती, हा मुर्तीवाला ह्या मूर्तीचे जीतके पैसे सांगेल ते आपल्याला देता येणार नाहीत. पण घडला प्रकार उलटा. पण घडला प्रकार उलटा त्या राजस्थानी मुर्तीवाल्याने भाऊंनाच विचारलं “तुम्ही केवढे पैसे देऊ शकता?” आणि भाऊंनी दिलेले पैसे घेऊन तो आनंदाने गेला.
म्हणजे तो ईश्वराचाच तर अवतार नव्हता – एवढया दुरून मूर्ती घेऊन आला आणि स्वतःच देवून गेला? तर अशा प्रकारे १९०२ साली मूर्तीची मंदिरात स्थापना झाली. भाऊंच्या म्हणजे गणपत जीवनजी महंताच्या जीवनाच महतकार्य झालं. ते म्हणजे राम मंदिर भव्य प्रमाणात उभं राहील.
श्री हनुमंत. श्री राम, श्री शंकर व ग्रामदेवता श्री पाटला देवी ह्या देवतांच्या परिसरात आता धार्मिक कार्याचा ओघ वाढला. सणा-वारला लोकांना एकत्र यायला एक श्रद्धास्थान मिळालं आणि २०० वर्षाच्या ह्या परंपरेत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वर्णी लागल्या – तेव्ह्या भाऊंच्या पश्चात त्यांचे वारसदार कै. श्री. पुरुषोत्तम दादोबा महंत ह्यांनी १९५८ साली मालाड देवस्थान ट्रस्टची स्थापना केली. तेव्हा पासून खऱ्या अर्थाने हे मालाडचं राम पंचायतन लोकांच झालं…