मंदिराचे नुतनीकरण

आवाहन

सोमवार बाजार मालाड (प.) येथील १०२ वर्षे पुरातन श्रीराम मंदिर मालाड मधील भाविक रहिवाशांच्या श्रद्धा व आस्थेचे एक केंद्र बनले आहे. या मंदिर परिसरात श्रीराम मंदिर, श्री शंकर, श्री गणपती, श्री हनुमान, श्री दत्त, आणि ग्रामदेवी श्री पाटलादेवी यांची मंदिरे भक्तांना आशीर्वाद देत विद्यमान आहेत. काही मंदिरे १८०५ पासून उभी आहेत. धार्मिक वृत्तीचे दानशूर श्री गणपत जीवनजी महंत यांनी १९०२ साली त्यांचे गुरू श्री हरीनंदन स्वामी यांच्यासामाधीवर श्रीराम मंदिर निर्माण केले. त्यांचे वारस श्री पुरुषोत्तम दादोबा उर्फ भाई महंत यांनी १९७८ साली मंदिराच्या परिसराची जागा मालाड देवस्थान टृस्ट या सार्वजनिक न्यासाकडे हस्तांतरीत केली. तेव्हापासून मालाड देवस्थान टृस्टच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे मंदिराचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. मंदिरामध्ये धार्मिक पूजा-अर्चा त्याबरोबरच विविध समाजसेवी, शैक्षणिक उपक्रम ही राबविण्यात येतात. समाजातील विभिन्न संप्रदाय, संस्था तर्फे सत्संग, प्रवचन, संगीत आणि व्याख्यानाचे अनेकविध कार्यक्रम मंदिरामध्ये नियमित होत असतात.

या प्राचीन मंदिर संकुलास एखाद्या तीर्थक्षेत्राचे भव्य स्वरूप देण्याचा व त्याद्वारे आगामी १०० वर्षासाठी एक समृद्ध / वारसा निर्माण करण्याचा दृढ संकल्प श्रीराम मंदिर पुननिर्माण समिती तर्फे करण्यात आला आहे. मंदिर संकुल बांधकामाच्या पहिल्या टप्यामध्ये विद्यमान मुख्य श्रीराम मंदिर, श्री शंकर मंदिर तसेच श्री गणपति मंदिरांना त्यांचे पवित्र्य जपून अधिक सुंदर व कलात्मक स्वरूप देण्यात येणार आहे.

नवीन संकुलात काही नव्या मंदिराची भर पडणार आहे. उदा. श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री दत्त, श्री राधा-कृष्ण हया मंदिरांची स्थापना करण्यात येणार आहे. ही सर्व मंदिरे मोठ्या सभामंडपाशी संलग्न राहणार असून सर्व भक्तांना विविध मंदिरातील देवतांचे दर्शन सुलभतेने घेण्याची व्यवस्था असणार आहे.

मंदिर संकुल उभारण्याच्या दुसरया टप्प्यात ३ मजल्यामध्ये प्रवचन गृह, सभामंडप, संतकक्ष, पुस्तकालय, वाचनालय तसेच अन्य धार्मिक, सांस्कृतिक कार्याकमांसाठी आवशयक वास्तु निर्माण करण्यात येणार आहे.

श्रीरामाच्या मुख्य मंदिराच्या भव्य आकर्षक शिखराची उंची ८० फुट असून त्यास संलग्न असलेल्या इतर दोन शिखरांची उंची ५० फुट असणार आहे. तसेच शंकराच्या शिखराची उंची ७० फुट अशी आहे.

मंदिरच्या संकुल निर्माणाची अशी विशिष्ठ रचना करण्यात आली आहे की मंदिरात येणाऱ्या सर्वं श्रद्धाळू भक्तजनांना सर्व सुविधा उपलब्ध होतील. मंदिरास भव्य प्रवेशद्वारबरोबर वाहनतळ, विश्रांती स्थान, पाण्याची व्यवस्था, निसर्गरम्य परिसरनिर्माण करण्याचे नियोजन आहे.

मंदिर संकुल निर्मितीच्या या बांधकामास सुमारे ३ वर्षाचा कालावधी लागण्याचा संभव आहे. आपल्या सारख्या दातृत्वान, श्रद्धाळू भक्तजनांच्या सक्रीय सहकार्याने हे पवित्र धार्मिक कार्य यशस्वी होईल असा आम्हास दृढ विश्वास आहे. आपले आर्थिक तसेच अन्य स्वरूपाचे सहकार्य आम्हांस निनांत गरजेचे आहे. आपले यथाशक्ती योगदान देऊन आपण आम्हांस उपकृत करावे हे विनम्र आव्हान.