श्री पाटलादेवी
हे देऊळ पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे प्रवेशद्वार व दोन्ही बाजूच्या खिडक्या २०० वर्षापूर्वीचा इतिहास सांगतात. गाभाराच्या दोन्ही बाजूला पडव्या आहेत. सभामंडपात पूर्वी होमकुंड होते. मंदिरा समोरील जागा दुर्लक्षित होती. सोमवारचा बाजार ह्या जागेत भरे. चैत्र आमवस्या व अश्विनी नवरात्र ह्या दोन उत्सवात गावकरी मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला – नवसाला येतात. मंदिराचे महत्व लक्षात घेऊन १९९० साली मंदिराचे नुतनीकरण केले. हे काम त्यावेळचे दानशूर व्यक्ती श्री. हरिभाऊ गोपाळ केणी यांच्या सहकार्याने झाले. त्यावेळचे स्वतंत्र्य सेनानी जे सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेत सक्रीय होते ते म्हणजे श्री. मुरलीधर स्वामी यांनीही मंदिराच्या नुतनीकरणास सहकार्य केले. ट्रस्ट स्थापन झाल्यावर पाटलादेवीच्या समोर कुंपण घालण्यात आले. समोरील जागेत स्वच्छता करून दीपमाळेची रंग रंगोटी करून सोमवार बाजार देवळात मंदिर परिसरात बाजार भरण्यास बंदी करण्यात आली. त्यामुळे आई पाटलादेवीच्या भक्तांना मोकळेपणाने दर्शन घेणे शक्य झाले. २०११ साली श्री. दीपक पांडुरंग पवार यांनी स्वखर्चाने देवळाचा कायापालट केला. आज आई पाटलादेवी ही मालाड मधील लोकांची ग्रामदेवता आहे पण नवसाला पावणारी आणि भक्तांना तारणारी आई पण आहे.
श्री शंकर मंदिर
शिवाचे स्थान हे वरचे स्थान असते, त्या नुसार हे मंदिर पण उंच टेकडीवर असे होते. आज जशी कोकणात देवळ दिसतात तशीच कौलारू असे हे चार पाच पायऱ्या चढून जावं लागणार अस देऊळ होत. देवळाच्या सभा मंडपात दोन्ही बाजूने लाकडी पट्ट्या मारून आडोसा केलेला होता व गर्भागार जीथे शिवलिंग आहे ते तीन पायऱ्या खाली उतरून जावे लागे. हे शिवमंदिर ही पूर्वाभिमुख आहे. ओमकारातले ब्रम्हा स्वरूप अनुभवण्यासाठी इथे मोठ मोठे गायक-भक्त, साधक गर्भागारात येऊन ओमकार लावत भजने म्हणत. ह्या शंकर मंदिराच्या गर्भागारात जाताना डाव्या बाजुला भिंतीच्या कोनाड्यात गजाननाची मूर्ती बसवलेली होती. साधारण साडेतीन फुट उंच कोरलेली मूर्ती होती. ट्रस्टच्या नुतनीकरण्याच्या कामी भक्तांच्या सोईसाठी म्हणून ह्या मूर्तीला कोनाड्यातून काढून बाजुला एक देऊळ तयार करून बसवण्यात आले. भक्तांना प्रदक्षिणा घालणे त्यामुळे सोपे घाले. ही सर्व देवस्थाने जागृत आहेत. या मंदिराचे महत्व लक्षात घेऊन २०११ साली श्री. दीपक पांडुरंग पवार यांनी मंदिराचे नुतनीकरण केले
श्री राम मंदिर
स्वामी हरीनंद उर्फ गावकऱ्यांचे गोपी ह्यांच्या दृष्टांता नुसार कै. श्री. गणपत जीवनजी महंत यांनी हे राम मंदिर बांधले. सभामंडप सभा मंडपाला कोरीव खांब. दोन खांबाच्या मध्ये एक कमान. श्री राम लक्ष्मण सीता हनुमंत ह्यांच्या संगमरवरी मुर्त्या. ह्या देवळाला प्रदक्षिणा घालता येत नाहीत कारण ह्या मुर्त्या हरीनंद स्वामींच्या समाधीवर स्थापन केल्यामुळे असेल. आणखी एक गोष्ट ह्या मंदिराच्या बाबत जाणवते ती म्हणजे ह्या मंदिराला पाटलादेवी – शंकर मंदिरा समोरील दीपमाळे सारखी दीपमाळ नाही आणि हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. गाभाऱ्यात जाताना दरवाजाच्या चौकटीवर मध्यभागी गणपती बसवलेला आहे. इतक सुंदर देऊळ बांधण तस खर्चिक होत. त्यावेळचे धार्मिक श्री. देवडीवाला यांनी ह्या मंदिराचे सभागृह व इतर खर्च केला. ह्या मंदिराला आता १०८ वर्ष पूर्ण होतील.
देवळाच्या पवित्र जागेत एक औदुंबर आहे. राम मंदिराच्या डाव्या बाजूस ह्या औदुंबरस श्री. अक्कलकोट आणि श्री. गजानन महाराजांचे शिष्य श्री. गंगाधर स्वामी यांनी भेटी दिल्याचे ऐकिवात आहे. हेच महत्व लक्षात घेऊन ट्रस्टने भक्तांच्या सोईसाठी औदुंबराच्या चौथऱ्यावर दत्त मंदिर, श्री. अक्कलकोट स्वामी, श्री. गजानन महाराज व राधाकृष्णाच्या मूर्त्यांची स्थापना केली. छोट्या छोट्या देवळ्या बांधल्या व औदुंबरला एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले.
हा परिसर मोठा आहे आणि म्हणून तो भक्तांना आवडतो. ह्या राम पंचायतनात आल्यावर मन प्रसन्न होते व आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास एक दिशा मिळते हे ह्या देवतांच्या कृपार्शीवादा मुळेच.